पश्चिम बंगाल-
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहास साजरा केला जात आहे. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून उत्सवात सहभाग घेतला आहे. तसंच देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात झेंडावदन करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेलं सेलिब्रेशन लक्षवेधी ठरलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज झेंडावंदन करुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं. ममता यांनी देशासाठी बलिदान केलेल्या सर्व वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि देशातील प्रत्येक नागरिकानं लोकशाहीच्या मूल्यांचं पालन करायला हवं असं आवाहन केलं. देशासाठी आपलं रक्त सांडलेल्या शूरवीरांकडून मिळालेला स्वातंत्र्याचा वारसा अबाधित राखणं आपलं कर्तव्य आहे, असंही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लोकनृत्य सादर करणाऱ्या कलावंतांसोबतही ठेका धरला.
कोलकाताच्या के रोडवर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आदिवासी महिलांनी पारंपारिक नृत्य सादर केलं. ममता बॅनर्जी यांनीही आदिवासी महिलांना साथ देत त्यांच्यासोबत पारंपारिक नृत्यावर ठेका धरला.