कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून महाआघाडीची उभारणी सुरू आहे. मात्र विरोधकांचं नेतृत्त्व कोण करणार, पंतप्रधानपदाचं उमेदवार कोण असणार, याबद्दल अद्याप महाआघाडीकडून कोणतंही सुतोवाच करण्यात आलेलं नाही. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आज या प्रश्नाला उत्तर दिलं. सीबीआय विरुद्ध कोलकाला पोलीस या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर ममता यांना न्यायालयाच्या निर्देशांवर भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयानं कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना सीबीआयला सहकार्य करण्याच्या सूचना केल्यानंतर ममता बॅनर्जींनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे आमचा नैतिक विजय झाल्याचा दावा त्यांनी केला. केंद्राकडून घटनेचं उल्लंघन सुरू असल्याचा आरोप ममता यांनी केला. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करू, असंदेखील त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांना विरोधकांचं नेतृत्त्व कोण असेल? महाआघाडीचा पंतप्रधान कोण असेल?, असे प्रश्न विचारण्यात आले. आमच्याकडे सर्वजण पंतप्रधान असतील. देशातला प्रत्येकजण पंतप्रधान असेल. आमचं सरकार जनतेचं सरकार असेल, असं ममता म्हणाल्या. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना अप्रत्यक्ष टोला लगावला. या देशात कोणीही बॉस होऊ शकत नाही. फक्त लोकशाहीच इथली बिग बॉस आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. केंद्र सरकारवर टीका करताच कारवाई सुरू होते, असा आरोपही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा बंगालसह देशातील नागरिकांचा विजय आहे. आम्ही या लढाईत एकटे नाही. सर्व जनता आमच्यासोबत आहे, असं ममता यांनी म्हटलं.
कोण असेल पंतप्रधानपदाचा उमेदवार; बहुचर्चित प्रश्नाला ममता बॅनर्जींचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:48 PM