कोलकाताः दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये एचडी कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि अन्य विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या, त्यांच्यासोबत एकीचा हात उंचावणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य रस्ता दाखवल्याचा मजेशीर प्रसंग कोलकात्यात घडला.
झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांचं हेलिकॉप्टर शांतिनिकेतनमध्ये ठरल्या वेळी पोहोचलं. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधानांच्या स्वागताला मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी उपस्थित राहायचं असतं. परंतु, मोदी पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शांतिनिकेतनमध्ये पोहोचल्या नव्हत्या. त्यांना उशीर झाल्यानं राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी मोदींचं स्वागत केलं. इतक्यात, ममता बॅनर्जी धावत-पळत येत असल्याचं मोदींना दिसलं. तेही थोडे पुढे चालत गेले. तेव्हा, ममतादीदी ज्या रस्त्याने येत होता, तो थोडा खराब असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेचच ममतांना रस्ता बदलून बाजूच्या रस्त्यानं येण्याबाबत 'मार्गदर्शन' केलं.
एएनआय वृत्तसंस्थेच्या कॅमेऱ्याने हे दृश्यं अचूक टिपलंय. मोदींनी दाखवलेल्या मार्गावरूनच दीदी चालत आल्या आणि त्यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. मोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं लागल्यानं मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बघा, नेमकं काय घडलं...