नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसांचा दिल्ली दौरा संपवून आज कोलकात्याला परतत आहेत. यापूर्वी त्या म्हणाल्या, की त्यांनी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचा दिल्ली दौरा यशस्वी झाला आहे. ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या एकतेवर बोलता म्हणाल्या, की आता आपली घोषणा, 'लोकशाही वाचवा, देश वाचवा', अशी आहे.
ममता म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलले. पुढच्या वेळी त्यांची भेट घेईल. तसेच कोरोनामुळेही अनेक नेत्यांशी भेट होऊ शकली नाही. आता मी दर दोन महिन्याला दिल्लीत येईल. याच वेळी ममतांनी कृषी कायदे आणि पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तसेच शेतकऱ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्या म्हणाल्या.
बंगाल निवडणुकीनंतर ममता पहिल्यांदाच 26 जुलैला दिल्लीत आल्या होत्या. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना लस आणि पश्चिम बंगालचे नाव बदलण्यावर चर्चा केली. याच बरोबर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कमलनाथ, आनंद शर्मा, अभिषेक मनू सिंघवी, राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेत्यांचीही भेट घेतली.
ममता बॅनर्जी 2024 च्या दृष्टीने विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यावर जोर देत आहेत. सोनिया गांधीची भेट घेतल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, सर्व स्थानिक पक्ष एकत्रित आल्यास, एका पक्षाला भारी ठरतील. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट आणि चेहरा, यांवर बोलताना त्या म्हणाल्या, मी काही राजकीय ज्योतिषी नाही. त्यावेळच्या स्थितीवर सर्व अवलंबून असेल. जर कुणी दुसऱ्यानेही नेतृत्व केले, तरी समस्या नाही. त्या म्हणाल्या, कुणाला तरी नेतृत्व करावेच लागेल. वेळ आली, की चर्चा करू. मत थोपवण्याची माझी इच्छा नाही. कालच लालू यादवने फोनवर चर्चा केली. आम्ही रोज चर्चा करत आहोत. आणखी तीन वर्ष आहेत. आम्ही चर्चा करत आहोत.