कोलकाता: मोदी सरकारचे अच्छे दिन यापुढे येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट आता जवळ आली आहे, अशा शब्दांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीभाजपावर निशाणा साधला. मोदी सरकारच्या विरोधात आज तृणमूल काँग्रेसनं कोलकात्यात महारॅलीचं आयोजन केलं. या महारॅलीला 22 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. महारॅलीच्या निमित्तानं आज मंचावर संयुक्त भारताचं उत्तम उदाहरण आहे. लवकरच देशात एक नवी पहाट उगवली, असा विश्वास तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी व्यक्त केला. 'मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. येणाऱ्या काळात आपण एकत्र काम करू. यापुढे भाजपाचे अच्छे दिन येणार नाहीत. त्यांनी कितीही आश्वासनं दिली तरी त्यांचे अच्छे दिन पुन्हा येणार नाहीत,' अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर शरसंधान साधलं.येणाऱ्या काळात विरोधकांनी एकजूट दाखवावी. जिथे जो पक्ष मजबूत असेल, तिथे इतर पक्षांनी त्याला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिला. भाजपा पश्चिम बंगालमध्ये यशस्वी होणार नाही. त्यांना फक्त भोपळाच असेल, असा टोला बॅनर्जींनी लगावला. मोदींनी देशातील सर्व संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांना वाटतं फक्त तेच प्रामाणिक आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात महाआघाडी त्यांच्यासमोर आव्हान उभं करेल, असं त्यांनी महारॅलीला संबोधित करताना म्हटलं.