Mamata Banerjee on Bangladesh Violence: भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशची परिस्थिती अजूनही बिकट आहे. तेथे अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर हल्ले सुरूच आहेत आणि त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) बांगलादेशमध्ये शांतता मोहीम राबवण्याचे प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारला केली. तसेच, बांगलादेशात छळ होत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका संसदेला कळवावी, अशी मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या की, जर हे काम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपलब्ध नसतील, तर परराष्ट्रमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी निवेदन करावे.
MEA ने हस्तक्षेपाबाबत UN शी बोलावे: मुख्यमंत्री ममता
दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले की, दोन देशांमधील द्विपक्षीय मुद्द्यांवर भाष्य करणे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे, कारण बंगाल हे देशाच्या संघराज्य व्यवस्थेतील एक राज्य आहे. पण असे असले तरीही अलीकडील घडामोडी आणि शेजारच्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार पाहता शांत बसून चालणार नाही. अनेकांचे नातेवाईक तेथे आहेत. त्या नातेवाईकांनी त्यांचे वाईट अनुभव कथन केलेले आहेत. बंगालमधील अनेक लोक कामानिमित्त या देशात आहेत. अशा लोकांना करण्यात आलेली अटक आणि इस्कॉनशी असलेले संबंध पाहता, मला या सभागृहात हे सांगणे भाग पडले आहे की आता परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. परराष्ट्र मंत्रालयाला बांगलादेशी अधिकाऱ्यांसह आणि आवश्यक असल्यास संयुक्त राष्ट्रांकडे हा मुद्दा उचलण्याची विनंती मी केली आहे, असेही त्या म्हणाल्या.