नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखली येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांनी लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'टीएमसीचे गुंड मुलींचे अपहरण करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि ममता बॅनर्जी यावर काहीच कारवाई करत नाही,' असा आरोप इराणी यांनी केला आहे.
महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "बंगालमधील संदेशखली येथील काही महिलांनी मीडियासमोर आपली व्यथा मांडली. त्या महिलांनी सांगितले की, तेथील तृणमूलचे गुंड घरोघरी जाऊन कोणती महिला वयाने लहान आहे, कोणती महिला सुंदर आहे, ते बघतात तिचे अपहरण करतात. त्या महिलांना अनेक दिवस डांबून ठेवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. हे गुंड प्रामुख्याने हिंदू महिलांना टार्गेट करतात", असा आरोप इराणी यांनी केला.
ममतांवर टीका करताना इराणी म्हणाल्या, "तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी हिंदूंवरील अत्याचारांसाठी ओळखल्या जातात. विवाहित हिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर तृणमूलच्या कार्यालयात बलात्कार करण्यात येतो. या देशातील नागरिक म्हणून शांत बसू शकत नाही. आत्तापर्यंत सर्वांना प्रश्न पडत होता की, शेख शहाजहान कोण आहे? आता शेख शाहजहान कुठे आहे, या प्रश्नाचे उत्तर ममता बॅनर्जींना द्यावे लागेल," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
काय आहे प्रकरण ?स्थानिक टीएमसी नेता शेख शाहजहान आणि त्याच्या टोळीने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत संदेशखली येथे महिलांनी निदर्शने केली. तसेच जमिनीचा मोठा भाग बळजबरीने बळकावल्याचा आरोप केला. आरोपी फरार असून, त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी महिलांनी केली आहे. कथित रेशन घोटाळ्यात त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर जमावाने हल्ला केला तेव्हा शाहजहान फरार झाला होता. या घटनेनंतर भाजप नेते सुवेंधू अधिकारी आणि बंगालच्या राज्यपालांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.