पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी पुन्हा एकदा आंदोलक डॉक्टरांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. पण ही बैठक होऊ शकली नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ममता बॅनर्जी सरकारने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना तिसऱ्यांदा चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र बैठकीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासंदर्भात संपकरी डॉक्टर ठाम राहिले, यामुळे चर्चा होऊ शकली नाही.
महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुमारे दोन तास कॉन्फरन्स हॉलमध्ये डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची वाट बघितली. पण डॉक्टरांचे शिष्टमंडळ आले नाही. यानंतर ममता स्वतःच लाइव्ह आल्या आणि त्यांनी जनतेची माफी मागत आपण राजीनामा देण्यासही तयार आहोत, असे सांगितले. पत्रकारांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मला या पदाची परवा नाही. मला न्याय हवा आहे, मला केवळ न्याय मिळावा."
लाइव्ह स्ट्रीमिंगची डॉक्टरांची मागणी - दरम्यान, राज्य सरकारने बोलावलेल्या या बैठकीचे लाइव्ह टेलीकास्ट करण्यात यावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली होती. मात्र त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली नाही. सरकार बैठकीचे रेकॉर्डिंग करण्यास तयार होते. मात्र डॉक्टर लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी अडून बसले होते.
मी तीन दिवस वाट बघितली -मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, त्यांनी (आंदोलक डॉक्टर) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले, तरीही मी तीन दिवस त्यांची वाट बघितली. मी डॉक्टरांना पाठिंबा देणाऱ्या लोकांची माफी मागते. कृपया आपला पाठिंबा द्या. मला कसलीही समस्या नाही. आम्हाला सर्वसामान्यांसाठी न्याय हवा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, डॉक्टरांनी कामावर परतावे, अशी आमची इच्छा आहे." एवढेच नाही तर, तीन दिवस उलटून गेले आहेत, तरीही राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही, कारण कधी कधी सहन करावे लागते, हे आमचे कर्तव्य आहे," असेही ममता म्हणाल्या.