राज्यातील केंद्रीय संस्थांच्या कारवायांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे, असे आपल्याला वाटत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भाजप नेत्यांचा एक गट आपले हीत साध्य करण्यासाठी या संस्थांचा गैरवापर करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या "अतिरेका"विरोधात विधानसभेत मांडण्यात आलेल्या एका ठरावावर बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकारचा अजेंडा आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध एकत्र येऊ नयेत, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. भाजपने या प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर, हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.
'केंद्र हुकूमशाह सारखे वागत आहे' -बॅनर्जी म्हणाल्या, 'केंद्रातील सध्याचे सरकार एखाद्या हुकूमशाह सारखे वागत आहे. हा प्रस्ताव कुण्या एका विशेष घटनाविरोधात नाही. तर केंद्रीय संस्थांच्या पक्षपाती कामकाजाविरोधात आहे.' तर ईडी आणि सीबीआय विरोधातील अशा प्रकारचा प्रस्ताव विधानसभेच्या नियमांविरोधात आहे, असे भाजपने म्हटले आहे. हा प्रस्तावाच्या बाजूने 189 तर विरोधात 69 मते पडली.
'भाजप नेते रोजच्या रोज देतात धमकी' -खरे तर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्था पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत. यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत. बॅनर्जी म्हणाल्या, 'भाजप नेते रोज विरोधी पक्षातील नेत्यांना सीबीआय आणि ईडीची धमकी देत आहेत. केंद्रीय संस्थांनीही देशात अशा पद्धतीने कामकरणे योग्य आहे? यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, असे मला वाटत नाही. मात्र, काही भाजप नेते अपल्या हितासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहेत.'