महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 08:58 PM2021-03-21T20:58:09+5:302021-03-21T21:00:21+5:30
west bengal election 2021: भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे.
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal election 2021) मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. अशात आता भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. (west bengal election 2021 bjp leader amit shah release election manifesto)
भारतीय जनता पक्षाकडून घोषित करण्यात आलेल्या संकल्पपत्रात आश्वासनांचा पिटारा असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे हे संकल्पपत्र म्हणजे सोनार बांगला करण्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी स्पष्ट केले.
Home Minister and BJP leader Amit Shah releases BJP's manifesto for #WestBengalElection2021pic.twitter.com/XS2dVj0hzl
— ANI (@ANI) March 21, 2021
महिलांना आरक्षण आणि सीएए
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास महिलांसाठी सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच बंगलामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात येईल. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी मिळणाऱ्या ६ रुपयांमध्ये राज्य सरकारकडून ४ हजार रुपयांची भर घालण्यात येईल. तसेच मत्स्योद्योग करणाऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहेत.
राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास
तीन एम्स, सीमा सुरक्षेवर भर
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास तीन एम्स रुग्णालये उभारण्यात येतील. मुख्यमंत्री शरणार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक शरणार्थीला पाच वर्षापर्यंत डीबीटीतून १० हजार रुपये दरवर्षी देण्यात येतील. पहिल्या मंत्रिमंडळात बंगालच्या नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच बंगालच्या सर्व सीमा सुरक्षित करण्यात येतील, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ बंगालमधील शेतकऱ्यांना देण्यात येईल. याशिवाय ७५ लाख शेतकऱ्यांना १८ हजार रुपये देण्यात येतील. आतापर्यंत ही रक्कम देण्यात आलेली नाही. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासनही या संकल्पपत्रात देण्यात आले आहे.
"एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही"
सोनार बांगलासाठी संकल्पपत्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले संकल्पपत्र सोनार बांगलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून घोषणापत्र केवळ नावासाठी राहिले होते. मात्र, भाजपचे सरकार विविध राज्यांत स्थापन झाल्यापासून घोषणापत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भाजपकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण झाल्याचे जनतेने पाहिले आहे, असे अमित शहा यांनी यावेळी नमूद केले. भाजपचे सरकार आल्यास केंद्र आणि राज्य मिळून सोनार बांगलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील. आध्यात्मिक, विज्ञान, सामाजिक सुधारणा, शिक्षण, कला, साहित्य, संगीत या क्षेत्रात पुन्हा एकदा पश्चिम बंगाल आघाडीवर येईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.