कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal election 2021) मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. अशात आता भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे वर्तमानपत्रात जाहिरातांची भडीमार सुरू आहे. मात्र, यातीलच एका जाहिरातीमुळे भाजपाच जुमला उघडकीस आला आहे.
25 फेब्रुवारी रोजी कोलकता येथील जवळपास सर्वच वर्तमानपत्रात पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत एका महिलेचा फोटोही छापण्यात आला आहे. या महिलेला पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळाल्याचं सांगण्यात आलंय. तसेच, आत्मनिर्भर भारत-आत्मनिर्भर बांगला असंही या जाहिरातीत लिहिलं असून बंगालमधील 24 लाख कुटुंब आत्मनिर्भर बनल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, हा दावा खोटा असल्याचं सांगत आजही आम्ही भाड्याच्या घरात राहत असल्याचे जाहिरातीत फोटो असलेल्या लक्ष्मी देवी यांनी स्पष्ट केलंय.
गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. आमच्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य नीट झोपूही शकत नाहीत, एवढं लहान आमचं घर असल्याचं वर्तमानपत्रात जाहिरातीच्या माध्यमातून झळकलेल्या लक्ष्मी देवी यांनी म्हटलंय. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीने संबंधित महिलेच्या घरी भेट दिली तेव्हा, ती भाड्याने रहात असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या संदर्भातील जाहीरातीचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. तसेच, सातत्याने सांगितल्यानंतरही खोटं ते खोटंच राहतं, असं त्यांनी म्हटलंय. हॅशटॅग फॅक्टचेक असे म्हणत राहुल गांधींनी हा फोटो शेअर केलाय.
महिना 500 रुपये घरभाडे देतात
लक्ष्मी देवी या मूळच्या बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहेत. त्या लहान असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थलांतरित झाले होते. गेल्या 40 वर्षांपासून लक्ष्मी देवी कोलकाता येथील मलागा लाइन परिसरात राहतात. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मी देवी यांच्यावर येऊन पडली. त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली आहेत. दोन मुलं माझ्यासोबत राहतात. ते कुरिअर पोहोचवण्याचं काम करतात. यामधून त्यांना दिवसाला 200 ते 300 रुपये मिळतात, असे लक्ष्मी देवी यांनी सांगितले. तर, जेथे राहतात तेथे आजही 500 रुपये महिना भाडे देतात.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करत असून येथील लढाई प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळेच, भाजपाकडून जुमलेगिरीही करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं आहे. तर, नुकत्याच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊसही भाजपाने पाडल्याचं दिसून येतंय.
महिलांना आरक्षण आणि सीएए
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास महिलांसाठी सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच बंगलामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात येईल. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी मिळणाऱ्या ६ रुपयांमध्ये राज्य सरकारकडून ४ हजार रुपयांची भर घालण्यात येईल. तसेच मत्स्योद्योग करणाऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहेत.