West Bengal By-Election: बंगालमध्ये पुन्हा दिसली ममता बॅनर्जींची जादू, पोटनिवडणुकीत सर्व उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:29 IST2021-11-02T15:26:46+5:302021-11-02T15:29:33+5:30
या विजयासह पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूलच्या आमदारांची संख्या 217 वर पोहेचली आहे.

West Bengal By-Election: बंगालमध्ये पुन्हा दिसली ममता बॅनर्जींची जादू, पोटनिवडणुकीत सर्व उमेदवार विजयी
कोलकाता:पश्चिम बंगालच्या 4 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू पुन्हा चालली आहे. दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. टीएमसीच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत. दिनहाटामधून उदयन गुहा, खर्डामधून शोभनदेव चट्टोपाध्याय, गोसाबातून सुब्रत मंडल आणि शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी विजयी झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत टीएमसीने भाजपचा दारूण पराभव केला होता. भवानीपूरसह तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयाचा धडाका कायम राहिला आणि आता पुन्हा सर्व टीएमसीचे उमेदवार चार विधानसभा जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.या विजयासह विधानसभेत टीएमसीच्या आमदारांची संख्या 217 झाली आहे. तर, भाजपमधून आलेल्या आणखी पाच आमदारांचा समावेश केल्यास ही संख्या 222 वर पोहोचली आहे.
हे उमेदवार विजयी झाले
गोसाबा येथे तृणमूलचे उमेदवार सुब्रता मंडल 1 लाख 51 हजार मतांनी विजयी झाले आहेत. दिनहाटाचे टीएमसीचे उमेदवार उदयन गुहा 1 लाख 63 मतांनी विजयी झाले आहेत. खर्डामधून टीएमसीचे उमेदवार शोभनदेव चट्टोपाध्याय विजयी झाले आहेत. तर, शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी 63 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
भाजपला मोठा झटका
चार विधानसभेच्या जागांपैकी निसिथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार हे अनुक्रमे दिनहाटा आणि शांतीपूर या दोन जागांवर विजयी झाले, पण भाजपला त्या जागाही वाचवता आल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर टीएमसीने पुन्हा विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. या विजयानंतर टीएमसी आणखी मजबूत झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर, टीएमसी इतर राज्यांमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहे. तर, तिकडे ममता बॅनर्जी केंद्रातील राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहेत.