West Bengal Election Result 2021: कोरोनाने केलं पराभूत, मात्र मतदारांनी जिंकवलं; तृणमूलचा मयत उमेदवार आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 02:23 PM2021-05-02T14:23:16+5:302021-05-02T14:24:10+5:30
West Bengal Election Result 2021: सुरुवातीच्या निवडणूक निकालांच्या कलांमध्ये सिन्हा मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
कोलकाता: देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष मात्र पश्चिम बंगालकडे लागले आहे. भाजपला मोठे अपयश बंगालमध्ये येताना पाहायला मिळत आहे. कोरोना काळात झालेल्या या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनामुळे जीवनाची लढाई हरले असले, तरी मतदारांनी मात्र सिन्हा यांना जिंकवल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या निवडणूक निकालांच्या कलांमध्ये सिन्हा मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. (west bengal election result 2021 late kajal sinha tmc candidate leading in results died due to corona)
काजल सिन्हा यांना खरदाहा येथील मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली होती. कोरोना काळातही ते मोठ्या प्रमाणावर प्रचार करत होते. मात्र, या कालावधीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सहाव्या टप्प्यात म्हणजेच २२ एप्रिल २०२१ रोजी खरदाहा येथील मतदान पार पडले होते. यानंतर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच २५ एप्रिल २०२१ रोजी काजल सिन्हा यांचे निधन झाले. काजल सिन्हा यांच्या विरोधात भाजपने खरदाहा मतदारसंघात शीलभद्र दत्ता यांना रिंगणात उतरवले होते. सुरुवातीच्या कलानुसार दत्ता दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा
काजल सिन्हा यांच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चौघा उमेदवारांचा दहा दिवसांच्या काळात कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. काजल सिन्हा यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नंदिता सिन्हा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पतीचा मृत्यू निवडणूक उपायुक्त सुदीप जैन आणि इतर अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा सदोष मनुष्यवध असल्याचा दावाही नंदितांनी केला आहे.
दरम्यान, एकीकडे पक्ष जिंकत असताना ममता बॅनर्जी यांची जागा धोक्यात आली होती. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना मतमोजणीच्या सातव्य़ा फेऱ्यांपर्यंत झुंझवत ठेवले होते. मात्र, अखेर ममता यांना आघाडी मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास मोठ्या मतांनी आघाडी मिळविली आहे.