कोलकाता : भाजपला विधानसभा निवडणुकीत 70 जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. जलपायगुडी जिल्ह्यातील डाबग्राम-फुलबाडी येथे एका सभेला संबोधित करताना ममता म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे, की आतापर्यंत ज्या 135 जागांवर निवडणुका झाल्या आहेत. त्यात भाजपने आधीच 100 जागा जिंकल्या आहेत. मात्र, मी सांगते, की निवडणूक संपल्यानंतर, भाजपला एकूण 294 जागांपैकी 70 जागाही मिळणार नाहीत."
ममतांनी आरोप केला, की भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. गृह मंत्री अमित शाह दार्जिलिंगच्या लेबोंगमध्ये म्हणाले होते, की कुठल्याही प्रकारची एनआरसी होणार नाही. त्यांनी म्हटले आहे, की 14 लाख लोकांची ओळख पटली आहे आणि त्यांना राष्ट्रीय नागरिक रजिस्टरअंतर्गत अवैध प्रवासी शोधण्यासाठी प्रक्रियेच्या आधारे डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
...तर बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही -ममता म्हणाल्या, 14 लाख लोकांना डिटेंशन सेंटरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे, मात्र, तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू होऊ देणार नाही. आपण सर्व जण नागरिक आहात.
निवडणूक आयोगाने ममतांच्या प्रचारावर घातली होती 24 तासांची बंदी -निवडणूक प्रचारादरम्यान ममतांनी मुस्लीम मतांसंदर्भात भाष्य केले होते. 8 एप्रिलला हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच निवडणूक आयोगाने त्यांना 24 तास प्रत्यक्ष प्रचार करण्यास बंदी घातली होती. यानंतर ममता बॅनर्जी यांनी आयोगाचा निर्णय असंवैधानिक असल्याची टीका करत कोलकात्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ साडेतीन तास धरणे दिले होते.
प्रचारबंदी...तरीही प्रचार -ममता यांच्यावर प्रत्यक्ष प्रचाराला बंदी होती. परंतु त्या आंदोलनाला बसल्यानंतर तीन तास राष्ट्रीय व प्रादेशिक वाहिन्यांवर त्यांचे धरणे ‘लाईव्ह’ होते. सोबतच ‘सोशल मीडिया’वरदेखील त्याचीच चर्चा होती. प्रचारबंदी असतानादेखील दिवसभर चर्चा ममतांचीच होती.