West Bengal : सर्व Exit Polls मध्ये भाजप १०० पार; प्रशांत किशोरना शोधावं लागणार का नवं काम?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 10:13 PM2021-04-29T22:13:19+5:302021-04-29T22:19:17+5:30
पश्चिम बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास आपण हे काम सोडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे. काही एक्झिट पोल्सने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसच्या हॅट्ट्रिकचा दावा केला आहे, तर काही एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असा दावा केला आहे. परंतु या सर्वात प्रशांत किशोर यांच्याकडेही प्रामुख्यानं लक्ष जात आहे. एक्झिट पोलनुसार त्यांचा दावा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांना नवं कामही शोधावं लागू शकतं.
जर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं १०० चा आकडा पार केला तर आपण आपलं काम सोडू असं जाहीररित्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांणध्ये तृणमूल काँग्रेससाठी रणनिती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा ट्विटरवर हा दावा केला होता तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी ते ट्विटर सोडणार असल्याचा दावा केला होता. परंतु नुकतंच प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी जर भाजपनं १०० चा आकडा गाठला तर आपण निवडणुकांची रणनिती आखण्याचं काम सोडणार असं म्हटल्याचं आजतकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. भाजपला पश्चिम बंगालच्या निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर आपण हे काम करण्यात काहीच अर्थ नसल्याचं म्हणाले. यापूर्वीही त्यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये हा दावा करण्यात आला होता.
"मी जे काम करतो, ज्यामुळे तुम्ही माझ्याशी चर्ता करत आहात. मला रणनितीकार म्हणत आहा, कोणी आणखी काही म्हणतं, मी जे काही काम करत आहे ते करण्यात अर्थच राहणार नाही जर याठिकाणी भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या," असं प्रशांत किशोर मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.