कोलकाता :पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, आता ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीव बॅनर्जी यांनी आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठवला असून, ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजीव बॅनर्जी यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राजीव बॅनर्जी भारतीय जनता पक्षात (भाजप) सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजीव बॅनर्जी नाराज होते. मंत्रिमंडळाच्या तीन बैठकीतही राजीव बॅनर्जी यांनी गैरहजर राहिले होते. यानंतर ते राजीनामा देतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. हा माझा सन्मान आहे. ही संधी मला मिळाली, त्याबाबत मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो, असे राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नांना अपयश
राजीव बॅनर्जी बऱ्याच काळापासून पक्षात नाराज होते. राजीव बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरीस राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला, असे सांगितले जात आहे.
अमित शहांच्या उपस्थित पक्षप्रवेश
पुढील आठवड्यात अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचवेळी राजीव बॅनर्जी हेदेखील भाजप प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच राजीव बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ हावडासह राज्यातील इतर भागात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.
राजीनामा सत्र सुरूच
गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भट्टाचार्य यांनी सर्वप्रथमच काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुका जिंकली आणि नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.