कोलकाता: राजस्थान, आंध्र प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाने कपात केली आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये प्रतिलिटर एक रुपयाने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळणार आहे. याबाबतची माहिती देताना ममता बॅनर्जी यांनी इंधन दर वाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे महागाईचा भडका उडत असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. यासाठी राज्यातील जनतेला दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 रूपया कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. त्याचबरोबर, केंद्र सरकार पेट्रोलियम उत्पादनांवरील उपकर कमी करू शकते. मात्र, केंद्राकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत, अशी टीकाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली.
(राजस्थानपाठोपाठ आंध्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त; महाराष्ट्रात होणार काय?)
दरम्यान, देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने गेल्या सोमवारी (दि.10) भारत बंदची हाक दिली होती. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.