कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान दोन गटात आपापसात झालेल्या वादावादीनंतर हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण २६ टक्के मतदान झालं आहे. एकीकडे हिंसाचार सुरु असताना राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सुरक्षेसाठी ७१,५०० जवानांना तैनात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र परिस्थिती पाहता सरकारचा दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळतं आहे.
रिपोर्टनुसार, दक्षिण २४ परागंज, पश्चिम मिदनापूर आणि कूच बेहार जिल्ह्यांमध्ये काही गट आपापसांत भिडले. तसंच मतदान केंद्र ताब्यात घेतल्याची घटना घडली. स्थानिकांनी आपण मतदानासाठी गेलो असता टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे. त्यांना एमजेएन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
२४ परगना परिरात रविवारी रात्री सीपीएमच्या एक कार्यकर्ता आणि त्याची पत्नी घरी झोपेत असताना आग लावून जिवंत जाळण्यात आलं. यामागे टीएमसीचा हात असल्याचा सीपीएमचा आरोप आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये आक्रोश आहे. हिंसाचार सुरु असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बिलकंडा येथे एका भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. चाकूने हा हल्ला करण्यात आला असून, यामागे टीएमसी कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला जातो आहे.
पश्चिम बंगाल राज्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणूक होते आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालं. सकाळपासूनच लोकांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिला.