पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवाईनं धुमाकूळ घातलेला असतानाच आता पोलिसांनी तीन आमदारांना शनिवारी अटक केली आहे. या आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे तीनही आमदार झारखंडचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रोकड इतकी जास्त आहे की नोटा मोजण्याचं मशीन मागवण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालच्या हावडा येथे पोलिसांनी झारखंडचे काँग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कश्यप आणि नमन बिक्सल यांना अटक करण्यात आली आहे. तिघांकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली असून नोटा मोजण्याचं मशीन आल्यानंतरच मोजणी होऊ शकेल, अशी माहिती एसपी स्वाती भंगालिया यांनी दिली आहे.
आता झारखंडचे आमदार पश्चिम बंगालमध्ये का आले होते? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड ते कुठे घेऊन जात होते? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबतची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चौकशीनंतरच हळूहळू याबाबतची माहिती समोर येईल.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवायांची जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. चॅटर्जी यांच्या जवळची व्यक्ती असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या दोन घरांमध्ये टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ५० कोटी रुपयांची रोकड ईडीनं जप्त केली आहे. तर सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.