पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात इंस्टाग्रामवर भडकाऊ पोस्ट टाकल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. या तरुणीवर मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्या हत्येसाठी लोकांना चिथावणी देण्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे, आरजी कर रुग्णालयात डॉक्टरसोबत झालेल्या कृत्याविरोधात बंगालसह संपूर्ण देशभरात विरोध प्रदर्शन सुरू असतताच, ही घटना समोर आली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, "संबंधित आरोपीचे नाव कीर्ति शर्मा असे आहे. Instagram वर तिचे 'kirtisocial' नावाने अकाउंट आहे. तिच्यावर देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणेच मुख्यमंत्री ममता यांचीही हत्या करण्यासाठी लोकांना चिथावण्याचा आरोप आहे. संबंधित वृत्तानुसार, तरुणीने पोस्ट केले आहे की, 'ममता बॅनर्जी यांना इंदिरा गांधींप्रमाणेच गोळी घाला. जर आपण असे करू शकत नसाल, तर मी आपल्याला निराश करणार नाही."
माध्यमांतील वृत्तांनुसार, यासंदर्भात कोलकाता पोलिसांनी निवेदन जारी केले आहे. पोलिसांनी म्हटले आहे, "kirtisocial नावाचा इंस्टाग्राम आयडी असलेल्या आरोपीशी संबंधित एक तक्रार आली आहे. यूजरने नुकतेच आरजी कर रुग्णालयाशी संबंधित घटनेसंदर्भात तीन इंस्टाग्राम स्टोरी अपलोड केल्या होत्या. पोस्टमध्ये पीडितेचा फोटो आणि ओळखीचाही समावेश होता. जे अत्यंत आक्षेपार्ह आहे."
"या शिवाय आरोपीने आणखी दोन स्टोरी शेअर केल्या होत्या. यात पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या होत्या आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या टिप्पण्या प्रक्षोभक आहेत आणि सामाजिक अशांतता निर्माण करू शकतात आणि समुदायांमध्ये द्वेष वाढवू शकतात," असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे.