दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये महिषासुराच्या जागी गांधीजींना दाखवलं! आयोजक म्हणाले, हा निव्वळ योगायोग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:02 PM2022-10-03T18:02:11+5:302022-10-03T18:03:43+5:30
"आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. महात्मा गांधींचा अपमान अस्वीकार्य आहे. प्रशासनाने आयोजकांविरोधात कारवाई करायला हवी," असे भाजप प्रवक्त्या समिक भट्टाचार्य यांनी म्टले आहे.
कोलकात्यात स्थापन करण्यात आलेली दुर्गा मातेची मूर्ती सध्या चर्चेत आहे. या मूर्तीमध्ये मातेला महिषासुराच्या जागी एका व्यक्तीचा वध करताना दाखवण्यात आले आहे आणि ही व्यक्ती गांधीजी आहेत, असा दावा करण्यात येत आहे. संबंधित मूर्ती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांसोबत चर्चा केली. यानंतर, ही मूर्ती बदलण्यात आली आहे. या घटनेचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप, माकप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी निशेध केला आहे.
हा निव्वळ योगायोग - हिंदु महासभा
कोलकात्यातील साउथ वेस्टमध्ये रुबी पार्कजवळ दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, हा केवळ एक योगा-योग असल्याचे दुर्गा पूजेचे आयोजक अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटले आहे. "चष्मा लावलेली प्रत्येक व्यक्ती गांधी असेलच असे नाही. या मूर्तीत राक्षस गांधींप्रमाणे दिसणे हा निव्वळ एक योगायोग आहे. आमच्या मूर्तीत राक्षसाने ढाल पकडलेली होती. गांधींनी कधीही ढाल पकडलेली नाही," असे महासभेचे अध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यावेळी गोस्वामी यांनी स्वतंत्र्याच्या आंदोलनातील महात्मा गांधींच्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीकाही केली.
तृणमूलने BJP-RSS वर साधला निशाणा -
याप्रकरणावरून तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मूर्तीमध्ये गांधींना राक्षसाच्या रूपात दाखवून भाजपने आपला खरा चेहरा दाखवला आहे. संपूर्ण जग महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करते. पण भाजप केवळ गांधीवादी असल्याचा आव आणते, असे घोष यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर ही 'अभद्रपणाची पराकाष्ठा' असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने कारवाई करावी - भाजप
"आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. महात्मा गांधींचा अपमान अस्वीकार्य आहे. प्रशासनाने आयोजकांविरोधात कारवाई करायला हवी," असे भाजप प्रवक्त्या समिक भट्टाचार्य यांनी म्टले आहे.