लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे अनेक पक्ष अडचणीत येत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील उत्तर दीनाजपूरमधील चोपडा मतदारसंघांतील तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदूल रहमान यांच्या एका विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. येथून २६ एप्रिलला मतदान आटोपल्यावर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान माघारी जातील. त्यानंतर तुम्हाला आमच्याच फोर्ससोबत राहावे लागेल, अशी इशारावजा धमकी हमिदूल रहमान यांनी दिली आहे.
हमिदूल रहमान म्हणाले की, भाजपा, काँग्रेस आणि सीपीएमची काही माणसं प्रयत्नशील आहेत. मात्र मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती २६ एप्रिलपर्यंतच आहे. त्यानंतर तुम्हाला आमच्याच फोर्ससोबत राहावं लागणार आहे. जर भाजपा, काँग्रेस आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी काही केलं तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.
तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदूल रहमान एवढंच बोलून थांबले नाहीत. तर ते पुढे म्हणाले की, मी भाजपा, काँग्रेस आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की, तुम्ही आपलं बहुमूल्य मत वाया घालवू नका. २६ एप्रिलला सेंट्रल फोर्स माघारी जाईल. त्यानंतर आमचीच फोर्स इथे राहणार आहे. त्यामुळे जर काही घडलं, तर त्यांनी तक्रार देण्यासाठी किंवा खटला दाखल करून घेण्यासाठी यावं लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
हमिदूल रहमान यांच्या या धमकीनंतर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदूल रहमान यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. मतदार विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावताना त्यांना तुम्ही पाहू शकता. ते स्पष्टपणे सांगत आहेत की, एकदा निवडणूक संपली आणि केंद्रीय सुरक्षा दल निघून गेलं की, केवळ तृणमूल काँग्रेसचीच फोर्स उरणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचा सामना करावा लागेल, असे संकेत रहमान यांनी दिले आहे. तृणमूलच्या आमदाराने दिलेल्या धमकीची दखल निवडणूक आयगाने घ्यावी, अशी माझी त्यांनां विनंती आहे, अशी मागणी सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या १५० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील लोकसभे्च्या ४२ जागांसाठी ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. २६ एप्रिल रोजी रायगंज लोकसभा मतदारसंघाता मतदान होणार आहे. उत्तर दिनाजपूर विधानसभा मतदारसंघ हा रायगंज लोक,ङा मतदारसंघातच येतो.