पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खडसावले होते. तसेच ममतांबाबतचा निर्णय हा मी आणि पक्षाचे हायकमांड घेतील, असे सुनावले होते. मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधीर रंजन चौधरी यांना खडसावणे पश्चिम बंगालमधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारसे रुचलेले नाही, असे संकेत मिळत आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यानंतर बॅनरवरील कांग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या फोटोला शाई फासल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोलकाला येथील विधानभवना सोर काँग्रेसचे अनेक बॅनर लागलेले आहेत. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रे,च्या अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो लागलेले आहेत. दरम्यान, आज सकाळी त्या बॅनरवरील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या फोटोंवर शाई फासण्यात आल्याचे समोर आले. त्याच बॅनरवर राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांचेही फोटो होते. मात्र त्यांना कुठलेली नुकसान पोहोचवण्यात आल्याचे दिसून आले नाही. दरम्यान, हा प्रकार समोर येताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाही लावलेले बॅनर तिथून तातडीने हटवले.
या संपूर्ण वादाची सुरुवात काँग्रेसचे बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत केलेल्या एका विधानापासून सुरू झाली होती. त्याचं झालं असं की, ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधिक करताना देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झाल्यास त्या सरकारला आपला पक्ष बाहेरून पाठिंबा देईल, असं विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, त्या भाजपासोबतसुद्धा जाऊ शकतात, असे विधान अधीररंचन चौधरी यांनी केलं होतं. मात्र याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारले असता त्यांनी ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीसोबत आहेत. तसेच आपण सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे हल्लीच सांगितलं होतं. याबाबत अधीर रंजन चौधरी हे निर्णय घेणार नाहीत, तर मी आणि काँग्रेसचे हायकमांड निर्णय घेतील. जे या निर्णयाशी सहमत नसतील, ते बाहेर जातील, असा इशारा खर्गे यांनी दिला होता.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या इशाऱ्यााबाबत प्रतिक्रिया देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, जी व्यक्ती पश्चिम बंगालमध्ये मला आणि आमच्या पक्षाला राजकीयदृष्ट्या संपवू पाहत आहे, अशा कुठल्याही व्यक्तीच्या बाजूने मी बोलणार नाही. ही प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची लढाई आहे. तसेच अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, माझ्या वैचारिक भूमिकेमधून माझा ममता बॅनर्जी यांना विरोध आहे. तो व्यक्तिगत विरोध नाही. ममता बॅनर्जी यांच्याबाबत मला कुठलाही वैयक्तिक राग नाही. मात्र मी त्यांच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करतो, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.