West Bengal Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election Result 2024) मतमोजणी सुरु आहे. दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी पश्चिम बंगालमधून ( West Bengal) समोर येणारे कल भाजपाची निराशा करणारा आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला राज्यात जोरदार धक्का बसल्याचे दिसत आहे.
लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये टीएमसी २९ जागांसह आघाडीवर आहे. तर भाजपाला केवळ १० तर काँग्रेसला दोन जागा मिळतील असे दिसून येत आहे. मोदी सरकारने ११ मार्च रोजी देशात नागरिकत्व (सुधारणा) कायदा २०२४ (सीएए) जारी केला होता. त्यानंतर अनेक राज्यांतील लोकांना भारतीय नागरिकत्वही देण्यात आले. मात्र, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी सीएएम लागू करणे भाजपासाठी अडचणीचे बनल्याचे दिसून येत आहे. सीएएचा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीतून बसल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेतल्या होत्या. मात्र, राज्यातील लोकसभा निवडणुकीचा सुरुवातीचा कल पाहता या सभांचा प्रभाव दाखवत नाही. आतापर्यंत भाजपाला केवळ १० जागा मिळताना दिसत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आलेले एक्झिट पोल देखील या कलांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपाला राज्यात २८ ते ३१ जागा मिळताना दिसत आहेत. तर टीएमसीला ११-१४ जागा मिळाल्या होत्या, पण आतापर्यंतचा कल यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, भाजपाचे प्रबळ उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार हे त्यांचे प्रतिस्पर्धी टीएमसीचे बिप्लब मित्रा यांच्यापेक्षा बलुरघाट जागेवर ४,८५५ मतांनी पिछाडीवर आहेत. पश्चिम बंगालच्या आसनसोल जागेवर भाजपाचे उमेदवार एसएस अहलुवालिया हे त्यांचे प्रतिस्पर्धी टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा ६,९५६ मतांनी पुढे आहेत. बांकुरा लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार अरुप चक्रवर्ती यांनी भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुभाष सरकार यांच्यावर ३,७६५ मतांची आघाडी घेतली आहे.
ममता बॅनर्जी यांनी केला होता सीएएला विरोध यूसीसी, एनआरसी आणि सीएए लागू होऊ देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या निमित्ताने जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले होते. ममता बॅनर्जींसह अनेक विरोधी नेते अजूनही सीएएला विरोध करत आहेत. मात्र, विरोध असूनही २९ मे रोजी पश्चिम बंगालमधील लोकांना नागरिकत्व (दुरुस्ती) नियम २०२४ अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत सीएएचा निर्णय भाजपावर उलटल्याचे चित्र दिसून येत आहे. तर बंगालमध्ये ममतांची जादू कायम असल्याचे म्हटले जात आहे.