कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील 'वर्ड वॉर' व हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने 42 पैकी 34 जागांवर आपल्या झेंडा फडकवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी जोरदार तयारी केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जींसाठी ही लढाई प्रतिष्ठेची तर आहेच, त्यातच भाजपा त्यांच्या गडाला सुरुंग लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाने निवडणूक प्रचारदरम्यान संपूर्ण फोकस पश्चिम बंगालमध्ये केंद्रित केला होता. ममता बॅनर्जींना टक्कर देण्यासाठी राज्यातील 42 मतदारसंघात आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. गेल्या निवडणुकीत फक्त दोन जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. तर, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने 42 पैकी 34 जागांवर विजय मिळवत आपल्या गड राखला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे देशातील जनतेचे लक्ष पश्चिम बंगालमधील निवडणुकीकडे लागले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपा आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.1999 साली दोन जागांवर मिळविलेल्या भाजपाने शायनिंग इंडियाच्या घोषणा देत 2004 ची निवडणूक पश्चिम बंगालमध्ये लढवली. मात्र, 2004 मध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर 2009 मध्ये भाजपा केवळ दार्जीलिंगची जागा मिळाली. तर 2014 साली मोदी लाटेत सुद्धा भाजपाला दोनच जागांवर समाधान मानावे लागले होते.