West Bengal LokSabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाईल जागांपैकी एक असलेल्या आसनसोलमधून बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा उमेदवारी देणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, शत्रुघ्न सिन्हा यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर, भाजपानेही आपला उमेदवार ठरवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मूळ बिहारचे असणारे शत्रुघ्न सिन्हा यांना प्रादेशिक नेते म्हणून ओळखले जावे, अशी येथील प्रत्येकाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, 2022 च्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोलची जागा तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती.
दरम्यान, आसनसोलसाठी भाजपाकडून अग्निमित्र पॉल आणि जितेंद्र तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अग्निमित्रा पॉल यांना 2022 च्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे केले होते, परंतु त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी हेही आसनसोल मतदारसंघातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. आसनसोलमध्ये बंगाली आणि बिगर बंगाली भाषिक मतदारांची संख्या जवळपास समान आहे. जितेंद्र तिवारी यांची हिंदी भाषिक मतदारांवर चांगली पकड आहे आणि ते आधी तृणमूलमध्ये असल्यामुळे त्यांना टीएमसीची रणनीती चांगली समजू शकतात.
मिथुन चक्रवर्ती यांच्याही नावाची चर्चामात्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात एखादा मोठा स्टार उभा केला, तर भाजपला बाजी मारता येईल, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे भाजपा सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना आसनसोलमधून उमेदवारी देऊ शकते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपाचा जोरदार प्रचार केला होता.