कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात सकाळी भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीबाबत माहिती देताना रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ८० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
रुग्णाच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आणि या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. सर्वप्रथम आग एका वॉर्डमध्ये लागल्याचं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आग पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आल्याचंही सांगण्यात आले. रुग्णालयातील आग आटोक्यात आल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं.
रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच पश्चिम बंगालचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा मंत्री सुजीत बोस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी टीके दत्ता यांनी ही घटना "भयानक" असल्याचं सांगितलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा एकूण ८० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र आगीची माहिती मिळताच सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यानंतर दिवसभर रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.