पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारीही गदारोळ बघायला मिळाला. मुख्यमंत्री ममता बनर्जी सभागृहात राज्यपाल जगदीप धनखड यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी उभ्या राहिल्या. मात्र, त्या बोलत असतानाच, भाजपच्या सदस्यांनी ''मोदी-मोदी'' अशा घोषणा देत त्यांच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.
यानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजप सदस्यांना ''जय बांगला'' म्हणत प्रत्युत्तर दिले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाही, तर पुढे त्यांनी भाजप सदस्यांना ''जय श्रीराम'' म्हणण्या ऐवजी ''जय सिया राम'' म्हणण्याचाही सल्ला दिला. बॅनर्जी यांनी आपले भाषण सुरू करताच विरोधकांनी ''मोदी, मोदी'', ''भारत माता की जय'' आणि ''जय श्री राम'' सारख्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या घोषणा ममतांच्या संपूर्ण 40 मिनिटांच्या भाषणापर्यंत सुरूच होत्या. यामुळे नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी, भाजप राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. तर टीएमसी शांततेसाठी लढत आहे, असा दावा केला.
यावेळी ममता, सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी भाजपच्या आमदारांनी विधानसभेत केलेल्या गदारोळाचासंदर्भ देत म्हणाल्या, "भाजप सदस्यांनी कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाही, राज्यपालांचे आभार." पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी पहिल्याच दिवशी गदारोळ झाला. कारण, भाजप आमदारांनी राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराचा निषेध केला आणि धनखड यांना आपले भाषण थोडक्यात अटोपते घ्यावे लागले होते.