कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांनी नबन्ना मोहिम घोषित केली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जागोजागी पोलीस करडी नजर ठेवून आहेत. हावडा ब्रीज सील करण्यात आला आहे. जवळपास १००० हजार विद्यार्थी हेस्टिंग्स परिसरात पोहचले त्यातील काही बॅरिगेट्सवर चढले. विद्यार्थी आणि पोलीस यांच्या झटापटीत जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचाही वापर केला.
पोलिसांनी नबन्नापर्यंत( राज्य सचिवालय) लाँग मार्च रोखण्यासाठी हावडा ब्रीजवर बॅरिकेट्स लावले होते. जे पाडून आंदोलनकर्ते पुढे जाऊ लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी वॉटर गनच्या माध्यमातून पाण्याचे फवारे आंदोलकांवर सोडले त्यासोबत लाठीचार्जही केला. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा होताच संतापलेल्या जमावाने दगडफेक सुरू केली. या काही आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांना मारहाणीचे व्हिडिओही समोर आले आहेत.
'या' विद्यार्थ्यांनी पुकारलं आंदोलन
नबन्ना प्रोटेस्टचं आयोजन रवींद्रभारती विश्वविद्यालयातील एमएचे विद्यार्थी प्रबीर दास, कल्याणी विश्वविद्यालयातील शुभंकर हलदर आणि सयान लाहिडी नावाच्या विद्यार्थ्यांनी बोलावलं. आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही परंतु ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली. त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये आंदोलनाची धग पेटली. फेसबुक पोस्टवरून सुरू झालेले हे आंदोलन आज रस्त्यावर आलं आहे. या विद्यार्थ्यांच्या ३ प्रमुख मागण्या आहेत, त्यात निर्भयासाठी न्याय, गुन्ह्यातील आरोपीला फाशी आणि ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा यांचा समावेश आहे.
नबन्ना म्हणजे काय?
नबन्ना हे एका बिल्डिंगचं नाव आहे जी हावडा येथे आहे. राज्यातील सचिवालय इमारतीला नबन्ना भवन म्हटलं जातं. आंदोलनकर्त्यांनी नबन्ना इमारतीला घेराव घालण्याची तयारी केली आहे त्यामुळे सुरक्षा जवानांनी इथं कडेकोट बंदोबस्त लावला. ही १४ मजली इमारत आहे ज्यातून पश्चिम बंगाल सरकारचं कार्यालय चालतं. या इमारतीच्या टॉप फ्लोअरला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कार्यालय आहे तर १३ व्या मजल्यावर गृह सचिव बसतात. चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर गृह विभागाचे काम चालते.