कोलकाता: पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार स्वपन मजुमदार यांच्यावर शनिवारी त्यांच्या बनगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाणे जाळण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मजुमदार उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील अशोकनगर भागात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रॅलीदरम्यान भाजप आमदाराने आरोप केला की, स्थानिक पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक (IC) आणि अधिकारी (OC) भाजप कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, अटक करत आहेत. ते या भागातील टीएमसी कार्यकर्त्यांना त्यांचे अवैध काम करू देतात. पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपली वागणूक न बदलल्यास पोलिस ठाणे जाळून टाकू, अशा धमकीच्या स्वरात भाजप आमदारांनी पोलिस अधिकाऱ्यांना दम दिला.
भाजप आमदार पुढे म्हणाले, आमच्या एका कामगाराला या भागात बेदम मारहाण करण्यात आली आहे. मात्र तुम्ही अद्याप गुन्हेगाराला पकडले नाही. हे आम्ही सहन करणार नाही. जर तुम्ही तुमचा मार्ग बदलला नाही तर आम्हाला एक दिवस पोलिस स्टेशन पेटवून देऊ. आयसी/ओसी टीएमसीचे एजंट म्हणून काम करत राहिले आणि निष्पक्षपणे वागत नसतील तर त्यांना मारहाण करा, असे शब्द त्यांनी वापरले.
दरम्यान, आमदार मजुमदार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले की, स्वपन मजुमदार यांनी बोललेल्या शब्दांना पक्ष समर्थन देत नाही. पण, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजप समर्थकांवर हल्ला केला, तेव्हा पोलीस केवळ प्रेक्षक म्हणून उभे होते, हेही तितकेच खरे आहे, असेही ते म्हणाले.