कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. उत्तर 24 परगना येथील हलिशहरमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करत हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याचे भाजपाने म्हटले आहे.
भाजपाने यासंदर्भात ट्विट केले आहे. "आणखी एक दिवस, आणखी एक हत्या. हलिशहरमध्ये कार्यकर्ता सैकत भवाल यांची टीएमसीच्या गुंडांनी निर्घृण हत्या केली, तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना कल्याणीच्या जेएन मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्टीचे डोर टू डोर कॅम्पेन करत असताना सैकत भवाल यांच्यावर हल्ला झाला," असे ट्विट करण्यात आले आहे.
दुसरीकडे, ही घटना वैयक्तिक वैर असल्यामुळे घडल्याचे तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर भाजपा नेते मुकुल रॉय म्हणाले की, आरएसएस कार्यकर्ता आणि सहा नंबर वॉर्ड हलिशहरमध्ये राहणारे सैकत भवाल यांची हत्या करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे.
दरम्यान, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी असताना येथे राजकीय हिंसाचार सुरु झाला आहे. भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसांत बर्याच वेळा संघर्ष झाला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत असल्याचा दोन्ही पक्षांचा आरोप आहे. नुकतेच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरला जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनाही दुखापत झाल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.