ऑनलाइन लोकमत
संदेशखली (पश्चिम बंगाल), दि. ३१ - शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सध्या रन पेटलेले असतानाच या घोटाळ्याप्रकरणी जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना अटक झाली तर संपूर्ण पश्चिम बंगाल पेटेल असा इशारा तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रिस अली यांनी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात पक्षावर झालेले आरोप खोटे असून त्याप्रकरणी भाजपाने सीबीआयचा गैरवापर करू नये. ममता बॅनर्जींचा या घोटाळ्यात बिलकूल सहभाग नाही, जर त्यांच्या प्रतिमेस धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला तर परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.
शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा तसेच खासदार कुणाल घोष आणि श्रींजॉय बोस यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या गुंतवणूकदारांचे कथित १० हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. या घोटाळ्यात ममता बॅनर्जींचा हात असल्याता आरोप तृणमूल काँग्रसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी केला असून याप्रकरणी सध्या रान पेटले आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना इद्रिस अली यांनी पक्षावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ममता बॅनर्जी या फक्त बंगालची नव्हे तर संपूर्ण देशाची 'अग्निकन्या' आहेत. त्यांना कोणीही हात लावला अथवा अटक केली तर संपूर्ण राज्य पेटून उठेल आणि अनेक लोक त्यात होरपळून निघतील, अशी धमकीच अली यांनी दिली आहे. कोणीही बॅनर्जी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला तर जनता ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.