मिदनापूर - पर्यावरण संवर्धनासाठी अनेक जण पुढाकार घेत असतात. पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील पिराकाटा रेंजच्या फॉरेस्ट ऑफिसरने तब्बल 1100 प्लास्टिक बॉटल्स आणि टायरचा वापर करून एक अनोखी बाग तयार केली आहे. पपन मोहंता असं या फॉरेस्ट ऑफिसरचं नाव असून त्यांनी गेली चार वर्षे आपलं काम सांभाळून बाग फुलवली आहे. पिराकाटा रेंज ऑफिसमध्ये त्यांनी ही सुंदर बाग फुलवली आहे. मोहंता यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
प्लास्टिक बॉटल्स आणि रबर टायरच्या मदतीने बाग फुलवण्याचा पपन मोहंता यांचा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. मोहंता यांनी तयार केलेली बाग आकर्षणाचं केंद्रबिंदू झाली आहे. दररोज अनेक जण या बागेला आवर्जून भेट देत असतात. भेट देणारे लोक त्यांची खूपच स्तूती करतात. तसेच परिसरातील अनेक ठिकाणी आणि शाळांमध्येपर्यावरणाच्या दृष्टीने हिताचे असलेले असे उपक्रम घेण्यात येत आहेत.
'जेव्हा माझी या ठिकाणी पोस्टींग झाली तेव्हा हा परिसर अस्वच्छ होता. खूप कचरा होता. मी या जागेला सुंदर बनू इच्छित होतो. त्यामुळेच मी येथे एक सुंदर बाग तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 1100 प्लास्टिक बॉटल्स आणि रबर टायरचा वापर केला' असं पपन मोहंता यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. काही स्थानिक शाळा देखील आपल्या शालेय परिसरात अशा रितीने बाग फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत असं सांगितलं.
सुबिनय घोष हे एका शाळेत शिक्षक असून त्यांनी मोहंता यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या शाळेत देखील असा पर्यावरणपूरक उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळून भविष्यात पर्यावरणाचे रक्षण कसे करावे हे या बागेतून शिकायला मिळते. सर्वांनी याचा विचार करावा. या सुंदर आणि अनोख्या बागेत प्लास्टिक बॉटल्स आणि रबर टायरचा योग्य वापर करण्यात आला असल्याचं घोष यांनी सांगितलं.