first Encounter in Mamata Bannerjee Government : पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पहिला एन्काउंटर झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालपोलिसांनी उत्तर दिनाजपूरमध्ये एका माफियाला गोळ्या घातल्या. तो पोलिस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी पोलिसांनी माफियाशी संघर्ष केला आणि त्याला गोळ्या घालण्यात आल्या. पश्चिम बंगालचे डीजी राजीव कुमार यांनी आधीच सांगितले होते की जर कोणी एक गोळी चालवली, तर आम्ही चार गोळ्या झाडू. त्यानुसार पोलिसांनी आक्रमक कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
ममतांच्या राजवटीत पहिलाच एन्काउंटर
ममता बॅनर्जींच्या कारकिर्दीत एखाद्या गुन्हेगाराला एन्काउंटर करून ठार मारण्याची ही पहिलीच घटना आहे. उत्तर प्रदेश गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारांच्या एन्काउंटरमुळे चर्चेत आहे. मात्र आता इतर राज्यातही अशी प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. पश्चिम बंगालमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ममता बॅनर्जी गेल्या १४ वर्षांपासून बंगालमध्ये राज्य करत आहेत. पण त्यात हे पहिल्यांदाच घडले.
१४ वर्षांची सत्ता... मग आताच 'हे' का?
७० वर्षीय ममता बॅनर्जी यांनी २० मे २०११ रोजी पहिल्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतली. २७ मे २०१६ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०२१ मध्येही त्यांच्या पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला आणि ममतांनी सलग तिसऱ्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतली. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या ममता यांचे ध्येय बंगालच्या सत्तेतून डाव्या विचारसरणीची हकालपट्टी करणे हेच आहे. पण १४ वर्षांत अचानक एन्काउंटरची घटना का घडला असावी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बंगालमधून 'डाव्यांना' बाहेर काढले...
बंगालमधून डाव्या विचारसरणीला हुसकावून लावण्यासाठी ममता यांनी अनेक वेळा आपले मित्रपक्ष बदलले. कधी त्या केंद्रात एनडीएमध्ये सामील झाल्या तर कधी काँग्रेसमध्ये सामील झाल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत स्वत:चा पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारांची सुमारे साडेतीन दशकांची सत्ता संपवून ममता सत्तेवर आल्या. रेल्वे मंत्री बनणाऱ्या ममता या देशातील पहिल्या महिला होत्या.