West Bengal: प्रचारादरम्यान वादग्रस्त भाषणाप्रकरणी कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:41 PM2021-06-16T12:41:10+5:302021-06-16T12:42:50+5:30
West Bengal Election : वादग्रस्त भाषण केल्यासंबंधी मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात दाखल आहे तक्रार. FIR रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्तींनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा.
West Bengal Election Mithun Chakraborty : काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रचारसभेदरम्या वादग्रस्त भाषणाप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी मिथून चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी व्हर्च्युअल पद्धतीनं ही चौकशी केली. वादग्रस्त भाषण केल्याचं सांगत मिथून चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयानं तपास अधिकाऱ्यांना मिथुन चक्रवर्ती यांची व्हर्च्युअली चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मार्च महिन्यात कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. "आपण एक नंबरचे कोब्रा आहोत. डसलो तर फोटो बनून जाल," असं वक्तव्य ब्रिगेड ग्राऊंडवर आयोजित सभेदरम्यान त्यांनी केलं होतं. "मी बंगाली असल्याचा मला अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे," असंही ते म्हणाले होते.
यापूर्वी मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवरही गेले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं आपली पूर्ण ताकद लावली होती. परंतु यानंतरही ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून हटवण्यात त्यांना यश आलं नाही. तृणमूल काँग्रेसनं २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा सत्ता आपल्या हाती ठेवली आहे.