कोलकाता:पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात बंगाल पोलिसांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री उशिरा चेकिंगदरम्यान रामपूरहाट पोलिसांना 5,500 जिलेटिनच्या काड्या आणि 2,300 डिटोनेटर सापडले आहेत. मोठ्या प्रमाणावर स्फोटके कुठे नेली जात होती ? त्यामागे षडयंत्र आहे का? यात आणखी कोण सामील आहे? याचा पोलिस तपास करत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 14 वरुन एक ट्रकमध्ये स्फोटके घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावार बीरभूमच्या रामपूरहाट पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. यादरम्यान संपूर्ण ट्रक स्फोटकांनी भरलेला असल्याचे निदर्शनास आले.
चालक आणि मदतनीस फरार
जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये जिलेटिनच्या 5,500 कांड्या आणि 2,500 डिटोनेटरचा समावेश आहे. मात्र, ट्रकचा चालक आणि मदतनीस पोलिसांना पाहून पळून गेला. आता रामपूरहाट पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी बीरभूममध्ये एकापेक्षा जास्त वेळा स्फोटके जप्त करण्यात आली होती. निवडणूकानंतरच्या हिंसाचारात याच जिल्ह्यावर अनेक आरोप झाले आहेत.
राज्यातील 4 विधानसभा जागांवर 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बीरभूममध्ये अनेक दगडांच्या खाणी आहेत, ज्यात जिलेटिनच्या काड्या वापरल्या जातात. मात्र, त्या कामात अशा स्फोटकांचा वापर केला जातो की नाही याबाबत शंका आहे. राष्ट्रीय महामार्गावरून इतकी स्फोटके जप्त केल्यामुळे पोलिस प्रशासन चिंतेत आहे. यामागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.