ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:56 AM2021-06-04T11:56:33+5:302021-06-04T11:58:49+5:30
मुकूल रॉय यांच्यासह तब्बल ३३ आमदार भाजपला रामराम करण्याची शक्यता
कोलकाता: पश्चिम बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. मात्र तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हं आहेत. भाजपचे ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठं भगदाड पडू शकतं.
सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीआधी कमळ हाती घेतलं. सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता यांनी राज्याची सत्ता राखली. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल ३३ आमदार तृणमूलमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी तृणमूलचे ३३ आमदार भाजपमध्ये गेले होते. आता तितकेच आमदार पुन्हा तृणमूलमध्ये येऊ शकतात.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले मुकूल रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करू शकतात. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अतिशय निकटवर्तीय सहकारी राहिलेले रॉय निवडणूक निकालापासून शांत आहेत. त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉयनं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे रॉयदेखील पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. तशी चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी रॉय रुग्णालयात गेले होते. मुकूल रॉय यांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री बॅनर्जींनी त्यांची विविध व्यक्तींच्या माध्यमातून विचारपूस केली आहे.