कोलकाता - ममता बॅनर्जी यांनी आपल्या वहिनींना (भाऊजई) राजकारणात एंट्री दिली आहे. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आणि टीकाही झाली. एवढेच नाही, तर टीएमसीमध्ये 'घराणेशाहीची' मुळं खोलवर रुजत असल्याचेही बोलले जात आहे. पक्षात आधीपासूनच भाच्याचे वर्चस्व आहे आणि आता वहिनीही आल्या आहेत. पण वहिनींना राजकारणात आणण्यामागचे जे कारण सांगितले जात आहे. ते कारण फारच रंजक आहे.
ममता बॅनर्जींनी आपल्या वहिनींना फार आनंदाने राजकारणात आणलेले नाही. हा एक मजबुरीचा सौदा आहे. एकप्रकारे राज्यातील आपली प्रतिष्ठा वाचविण्याचा डाव आहे. ममतांच्या वहिनींचे पती अर्थात ममताचे मोठा बंधू ममतावर बऱ्याच दिवसांपासून नाराज आहेत. त्यांना राजकारणातही स्थान हवे आहे पण ममतांनी त्यांच्यापासून एक विशिष्ट अंतर ठेवले आहे.
भाजपमध्ये प्रवेशासंदर्भातील वृत्त - ममता यांनी आपल्या दुसऱ्या भावाचा मुलगा अभिषेक याला ज्या पद्धतीने राजकारणात प्रमोट केले, ते या 'भाऊ साहेबांना' आवडलेले नाही. यासंदर्भात त्यांनी अनेक वेळा जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्याही येत होत्या.
ममताचा भाऊच सर्वात कमकुवत कडी -विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी भाजपला रोखण्यात अथवा संपवण्यात व्यस्त आहेत. ते पाहता भाजपही मोठा धक्का देण्याच्या इराद्यात आहे. पण, तृणमूल काँग्रेसच्या कुण्याही मोठ्या नेत्याला फोडणे सोपे नाही. यामुळे त्यांना ममतांचा 'भाऊ'च सर्वात कमकुवत वाटत आहे.
भावाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न -ममता यांच्या 'भावा'शी संपर्क साधावा, जर त्यांची भाजपमध्ये येण्यासाठी काही अट असेल तर, त्यावरही विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिल्लीतून राज्यातील नेत्यांना मिळाले आहेत. ममतांना भाजपच्या या हालचालींची कुणकुण लागताच त्या सतर्क झाल्या आणि त्यांनी भावाची नाराजी दूर करण्यासाठी वहिनींना कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट देऊन राजकारणात एंट्री करवली.