काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील भाजपच्या काही जणांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता तृणमूल काँग्रेसनं काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित मुखर्जी यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर हे अतिशय दु:खद असल्याची प्रतिक्रिया त्यांची बहिण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिली. परंतु त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणत्याही घटनेचा उल्लेख केला नाही.
अभिजित मुखर्जी यांनी कोलकात्यातील तृणमूल भवनात उपस्थित राहत पक्षप्रवेश केला. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय आणि ज्येष्ठ मंत्री पार्थ चटर्जी उपस्थित होते. अभिजित मुखर्जी होती २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरून खासदार झाले होते. परंतु २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता.
बनावट लसीकरण प्रकरणात ममतांची बाजूपश्चिम बंगालमध्ये बनावट लसीकरण प्रकरण समोर आलं होतं. यावेळीही अभिजित मुखर्जी यांनी ममता बॅनर्जी यांची बाजू घेतली होती. "कोणत्याही व्यक्तीच्या चुकीसाठी पश्चिम बंगाल किंवा ममता बॅनर्जी यांना चुकीचं ठरवणं योग्य नाही. जर असं असेल तर मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय माल्ल्या यांच्याशी निगडीत प्रकरणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं जाऊ शकतं," असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं होतं.