नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे स्वप्न भंगले आहे आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) सलग तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता पुन्हा सत्तेत येण्यामागची आणि भाजपा सत्तेपासून दूर राहण्यामागची अनेक कारण सांगितली जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान पार पडले. यांपैकी अखेरच्या तीन टप्प्यात भाजपा सोबत 'खेला' झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झालेला पाहायला मिळाला आहे.
पश्चिम बंगालमधल्या आरामबाग येथे असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. भाजपा कार्यालयातील जाळपोळीसाठी तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयात आग लावली असून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या कृत्याचा निषेधही केला आहे.
अभिनेत्री कंगना राणौतनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. "बंगालमध्ये इथून पुढे होणाऱ्या रक्तपाताकडे दुर्लक्ष करणं अवघड होणार आहे. आत्तापर्यंत अनेकांना मारलंय. आता हारण्याच्या भीतीने त्यांना रक्ताची अजून तहान लागणार आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले होते. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली होती.