खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:56 PM2021-03-09T15:56:47+5:302021-03-09T16:00:09+5:30

West Bengal Assembly Election 2021 : राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

west bengal south 24 parganas around 200 crude bombs were recovered | खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब

खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तब्बल 200 गावठी बॉम्ब सापडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातून पोलिसांनी जवळपास 200 गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काशीपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या बॉम्बचा वापर कुठे होणार होता, याचा शोध घेतला जात आहे. 

गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी दक्षिण 24 परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तर पाच कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कोलकातातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शोवन देबनाथ, विक्रम शील, स्वपन कुराली, महादेव नाइक, अर्पण देबनाथ अशी जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. शुक्रवारी जेवण करत असतानाच आमच्यावर कोणीतरी बॉम्ब फेकले, असा दावा जखमी झालेल्या एका कार्यकर्त्याने केला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. 

फेब्रुवारीमध्ये पश्चिम बंगालचे मंत्री जाकिर हुसैन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमिता रेल्वे स्थानकात बॉम्बहल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. दक्षिण 24 परगनामधील सतगछिया येथून तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा (Sonali Guha)तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, आमदार सोनाली गुहा भाजपामध्ये करणार प्रवेश

"ममता दीदी मला सोडू शकतात तर मी का नाही? मी मुकुल रॉय यांच्याशी बोलले आहे की, मी निवडणूक लढणार नाही पण मला एक सन्माननीय पद हवं आहे. गुहा यांनी सांगितले की रॉय यांनी आपली मागणी मान्य आहे. मी नक्कीच भाजपमध्ये प्रवेश करेन" असं सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे. सोनाली गुहा या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळच्या सहकारी होत्या. मात्र तृणमूल काँग्रेसकडून यंदा गुहा यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तृणमूलकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर सोनाली गुहा यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळलं होतं. "देव ममता बॅनर्जींनी सदबुद्धी देवो. मी ममता बॅनर्जींना सुरुवातीपासून साथ दिली आहे. मला माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. मी एक राजकीय व्यक्ती म्हणून निष्क्रिय बसू शकत नाही" असं देखील सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे.

नेत्याला तिकीट नाकारल्याने TMC कार्यकर्ते संतापले; कार्यालयाबाहेर केली तोडफोड अन् जाळपोळ

तिकीट कापल्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. दक्षिण 24 परगणामधील भानगर भागातले पक्षाचे नेते अराबुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. नेत्याल तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. कार्यकर्त्यांनी चक्क पक्ष कार्यालयातील सामानाची जाळपोळ केली आहे. कार्यालयातील लाकडी खुर्च्याची तोडफोड करून त्या भररस्त्यात जाळल्याची घटना समोर आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपला निषेध व्यक्त केला आहे. 

Web Title: west bengal south 24 parganas around 200 crude bombs were recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.