कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी शुभेंदू अधिकारी यांचा राजीनामा नाकारला आहे. राजीनामा योग्य स्वरुपात (फॉर्मेट) नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, शुभेंदू अधिकारी यांना २१ डिसेंबरला स्वत: येऊन राजीनामा द्यावा लागेल, असे अध्यक्षांनी सांगितले आहे.
पश्चिम बंगालच्या ममता सरकारमध्ये मंत्री असलेले शुभेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्व पदाचा राजीनामा दिला. त्याआधी बुधवारी शुभेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, शुभेंदु अधिकारी लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शुभेंदु अधिकारी हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज होते. टीएमसीकडून त्यांना समजावण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र त्यांनी अखेर टीएमसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. टीएमसीमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पश्चिम बंगालमधील 65 विधानसभा जागांवर अधिकारी कुटुंबाची मजबूत पकड आहे. या जागा राज्यातील सहा जिल्ह्यात पसरलेल्या आहेत.
शुभेंदु अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर टीएमसीचे आमदार जितेंद्र तिवारी यांनीही पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जितेंद्र तिवारी हे सध्या पांडेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. शुभेंदु अधिकारी आणि जितेंद्र तिवारी यांचे राजीनामे ममता बॅनर्जींच्या टीएमसीमधील वाढत्या बंडखोरीकडे इशारा करीत आहेत.
शुभेंदू अधिकारी यांच्या प्रभावाखाली असलेल्या जागांची संख्या राज्यातील एकूण 294 जागांपैकी पाचपेक्षा जास्त आहेत. शुभेंदु अधिकारी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 1982 मध्ये कांथी दक्षिणमधून काँग्रेसचे आमदार होते. मात्र, नंतर ते तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक झाले.
शुभेंदु अधिकारी 2009 पासून कांथी मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2007 मध्ये शुभेंदु अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये इंडोनेशियन रसायन कंपनीविरूद्ध भूसंपादनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.