नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्सला मोठे यश आले आहे. 13 डिसेंबर रोजी रात्री एसटीएफ पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांनी दोन जणांना नकली नोटांसह अटक केली आहे. एसटीएफने 22 वर्षीय मिंटू एसके आणि 24 वर्षीय साहिन एसके यांना मुर्शिदाबाद, शिबपूर घाटातून अटक केली. दोघांकडून 500 रुपयांच्या 190 बनावट भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याशिवाय काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मथुरा पोलिसांनी देखील बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला होता. 9 डिसेंबर रोजी या टोळीतील तिघांना मथुरा जंक्शन येथून अटक करण्यात आली होती. ही टोळी चीनकडून सुरक्षेसाठी कागद मागवायची आणि बनावट नोटा छापून देशातील विविध राज्यात पाठवून द्यायची. मथुराच्या रेल्वे पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सर्व पितळ उघडे पडले. संशय आल्यावर रेल्वे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून कडक चौकशी केली. यानंतर आरोपींनी कबुली दिली आणि सांगितले की, ते बाजारात बनावट नोटा चालवण्याचे काम करतात.
पोलिसांनी केला पर्दाफाश याप्रकरणी मथुरा रेल्वेचे एसपी मुस्तफा खान यांनी म्हटले, "जीआरपी पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून प्रत्येकी 500 रुपयांच्या दीड लाख बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीतील इतरांना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत आहेत."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"