West Bengal SSC Recruitment Scam:पश्चिम बंगालमधील कथित एसएससी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज छापे टाकले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यादरम्यान एजन्सीने 20 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. ईडीने आपल्या रोख रकमेचे छायाचित्र ट्विट करत याबाबत माहिती दिली.
सूत्रांनी सांगितले की, कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दोन मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरांवर छापे टाकले. ईडीचे किमान सात ते आठ अधिकारी सकाळी 8.30 च्या सुमारास चॅटर्जी यांच्या नक्तला येथील निवासस्थानी पोहोचले आणि 11 वाजेपर्यंत छापा सुरू होता. यादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान बाहेर तैनात होते.
एजन्सीच्या अधिका-यांची आणखी एक टीम कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज येथील अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली, असे सूत्राने सांगितले. ईडीच्या सूत्रानुसार, शहरातील जादवपूर भागात असलेल्या पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्या निवासस्थानावरही अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
काय आहे प्रकरण?उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी आणि अनुदानित शाळांमधील गट 'क' आणि 'डी' कर्मचारी आणि शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो चौकशी करत आहे. त्याच वेळी, अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंगच्या तपासात सामील आहे.