कोलकाता : ममता सरकारने पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांच्यावर कारवाई केली आहे. पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात (SSC recruitment scam) पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. ज्यावेळी ते शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
बंगालच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पार्थ चॅटर्जी यांना उद्योगमंत्री पदासोबतच इतर पदांवरूनही हटवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण विभाग, संसदीय कामकाज इत्यादी विभागातूनही कार्यमुक्त करण्यात आले आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीला अटक केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या 5 दिवसांपूर्वीच ईडीला अर्पिता मुखर्जीच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ईडीने अर्पिता मुखर्जीला 23 जुलै रोजीच अटक केली आहे. याचबरोबर, ईडीने बुधवारी पुन्हा एकदा कोलकात्यात्याच्या आसपास तीन ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांत ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील आणखी एका फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रुपये रोख आणि 5 किलो सोने सापडले आहे. विशेष म्हणजे, हे पैसे मोजण्यासाठी ईडीला तब्बल 10 तास लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा पैसा फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवण्यात आला होता. शिक्षक भरती घोटाळ्यात लाच म्हणून घेतलेला हा पैसा असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.