नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती (West Bengal SSC Scam) घोटाळ्यामध्ये ममता बनर्जी सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्ती अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी यांना उद्योगमंत्री पदासोबतच इतर पदांवरूनही हटवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण विभाग, संसदीय कामकाज इत्यादी विभागातूनही कार्यमुक्त करण्यात आले आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीला अटक केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरण एक मोठ्या कटाचा भाग आहे. हा एक मोठा खेळ आहे. मी सध्या यावर जास्त बोलणार नाही. मात्र तृणमूल काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष असल्याने आम्ही त्यांना मंत्रिपदावरुन हटवलं, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
गेल्या ५ दिवसांपूर्वी देखील ईडीला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून २१ कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. त्यामध्ये अर्धा-अर्धा किलोच्या बांगड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत एकुण ५० कोटी रुपये अर्पिताच्या घरातून ईडीला मिळाले आहे. ईडीने अर्पिताला २३ जुलै रोजीच अटक केली आहे.
अर्पिताच्या घरातून ईडीला एक काळी डायरी देखील सापडली होती. सदर डायरी ही Department of Higher And School Education च्या संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही डायरी ४० पानांची असून यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. ही डायरी शिक्षक भरती घोटाळाप्रकरणीचे अनेक रहस्य उलघडू शकते.