नंदीग्राम - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय आखाडा जबरदस्त रंगात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपकडून एका पाठोपाठ एक हादरे देणे सुरूच आहे. नुकताच सुबेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता आपला भाऊ आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सौमेंदू अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये सामील होणार असल्याचे सुवेंदू यांनी शुक्रवारी सांगितले. सौमेंदू यांना नुकतेच कोन्टाई नगरपालिकेच्या प्रशासक पदावरून दूर करण्यात आले होते.
सुवेंदू यांनी पूर्व मिदनापूर येथे एका बैठकीत सांगितले, की माझा भाऊ सौमेंदू काही नगरसेवक आणि तृणमूल काँग्रेसच्या 5,000 कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करणार आहे. सौमेंदू कोन्टाई येथे शुक्रवारी सायंकाळी भाजपत प्रवेश करतील. यामुळे आता तृणमूल काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचेही ते म्हणाले.
घरा-घरात उमलणार कमळ -सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले, की सौमेंदू यांच्यासोबत अनेक नगरसेवक आणि तृणमूल काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील 5,000 कार्यकर्ते आहेत. आता घरा-घरात कमळ उमलेल, असे सौमेंदू यांनी गुरुवारी म्हटले होते, तेव्हाच ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले होते. सुवेंदू यांचे वडील आणि एक भाऊ हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत.
तृणमूल काँग्रेसने सौमेंदू अधिकारी यांच्यावर केली होती कारवाई -सुवेंदू अधिकारी यांच्या बंडानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांना पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कांथी नगरपालिकेच्या प्रशासक बोर्डावरून हटवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सौमेंदू अधिकारी हे सुवेंदू अधिकारी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमांना मदत करत असल्याचा आरोप तृणमूलच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबामागे मोठा जनाधार असून, सुमारे ४० विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते.