रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TTE बोलत असतानाच अचानकपणे हाय टेंशन विजेची तार तुटल्याने, एका टीटीईला विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूरच्या खडगपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर चारवर घडली. सुजान सिंह सरदार असे या टीटीईचे नाव आहे. ते थोडक्यात बचावले असून खडगपूर रेल्वे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल.
माध्यमांतील वृत्तांनुसार सुजान प्लॅटफॉर्म नंबर 4 च्या फुट ओव्हरब्रिजसमोर आपल्या एका सहकाऱ्यासोबत बोलत होता. त्याच वेळी हा अपघात घडला. यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
प्लॅटफॉर्मवर सहकाऱ्यासोबत बोलत होता टीटीई -संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात सुजानसिंह सरदार त्यांच्या एका टीटीई सहकाऱ्यासोबत बोलताना दिसत आहे. तेवढ्यात एक विजेची तार अचानक तुटते आणि तिचा स्पर्श सुजानला होतो. विजेचा धक्का बसल्यानंतर सुजन बेशुद्ध होऊन रेल्वे ट्रॅकवर पडतो. यावेळी त्याचा सहकारीही गडबडतो आणि तेथून बाजूला होतो. यानंतर प्लॅटफॉर्मवरील उपस्थित लोक आणि रेल्वे कर्मचारी सुजानला वाचविण्यासाठी धावतात. यासंदर्भात बोलताना, दक्षिण पूर्व रेल्वे खरगपूर शाखेचे वरिष्ठ डीसीएम राजेश कुमार म्हणाले, “विद्युत तार कशामुळे तुटली, याचा तपास आम्ही करत आहोत. सध्या टीटीईची स्वस्थ आहे.
विजेचा धक्का बसल्याने सुजान सिंह सरदार रेल्वे लाइनवर पडला. यानंतर, आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला रेस्क्यू करत खडगपूर रेल्वेच्या मुख्य रुग्णालयात भरती केले आहे. तो सध्या बरा आहे, असे राजेश कुमार यांनी म्हटले आहे.