कोलकाता - पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर टीएमसी सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहे. एवढेच नाही, तर TMCचे बडे नेतेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा (MLA Madan Mitra) हे रविवारी चहा विकताना दिसून आले. ते एका कार्यक्रमादरम्यान चहा देत होते आणि त्यांनी एक कप चहाची किंमत तब्बल 15 लाख रुपये सांगितली. (West Bengal TMC MLA Madan Mitra dons role of chaiwala and price of cup at rs 15 lakh)
यावेळी, राज्याचे माजी परिवहनमंत्री मित्रा हे पीएम मोदींवर टीका करत होते. या माध्यमाने तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी निवडणुकीतील आश्वासनांकडे सर्वांचे लक्ष वेधले. नरेंद्र मोदी यांनी 2014च्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही, असे ते म्हणाले.
'चलो दिल्ली' मोडमध्ये ममता दीदी; दर दोन महिन्याला करणार दिल्ली वारी; 2024 साठी दिली अशी घोषणा
मदन मित्रा हे कामरहाटी मतदार संघातून तृणमूलचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी कोलकात्याच्या भवानीपूर भागात एका कार्यक्रमात लोकांना मोफत चहा वाटला. पण, ज्या लोकांनी पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांच्यासाठी त्यांनी एका कप चहाची किंमत 15 लाख रुपये ठेवली होती.
मित्रा म्हणाले, हा एक विशेष चहा आहे. मला आशा आहे, की या चहाची चव मोदी जींनी बनवलेल्या चाहाच्या चवीशी मिळती-जुळती असेल. ते जेव्हा रेल्वे स्थानकावर चहा विकत होते, जसेकी त्यांनी दावा केला आहे.
मित्रा म्हणाले, मी हा चहा मोफत देत आहे. पण, जर तुम्ही किंमत विचारत असाल तर या चहाची किंमत 15 लाख रुपये आहे, जे आश्वासन त्यांनी प्रत्येक भारतीयाला दिले होते. तत्पूर्वी, इंधन दर वाढीचा निषेध करण्यासाठी मित्रा यांनी बैलगाडीची सवारीही केली होती. मित्रा यांच्या या शैलीचे भाजप नेते दिलीप घोष यांनीही कौतुक केले होते. मित्रा फेसबुकवर तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.