West Bengal Train Accident : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात आज एक धक्कादायक घटना घडली. मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात होऊन 15 जणांचा मृत्यू झाला, तर 60 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, या अपघातावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या अपघातामुळे मला खूप दु:ख झाले आहे. अपघाताची दृश्ये वेदनादायक आहेत. या कठीण काळात आम्ही पीडित कुटुंबांसोबत आहोत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी आमची इच्छा आहे. पीडितांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची आमची मागणी आहे.'
'गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने रेल्वे मंत्रालयात 'गैरव्यवस्थापन' केले आहे. एक जबाबदार विरोधी म्हणून मोदी सरकारने रेल्वे मंत्रालयाचा स्वतःच्या प्रमोशनसाठी कसा वापर केला, हे सांगणे आमचे काम आहे. या घटनेसाठी मोदी सरकारला जबाबदार धरू,' असेही खरगे यांनी म्हटले.